वरखडवाडी व दोडकनदीच्या सातबारा ऑनलाइन नोंदींचा प्रश्न मार्गी!
जमाबंदी आयुक्त पुणे यांच्याकडून तातडीने मंजुरी; शिवाजी पाटोळे, महेश सोनवणे सर व केशव बोडके यांच्या प्रयत्नांना यश
देवठाण प्रतिनिधी :
देवठाण गावाचे विभाजन होऊन वरखडवाडी व दोडकनदी ही दोन स्वतंत्र महसुली गावे अस्तित्वात आली. मात्र, या दोन्ही गावांतील सातबारा उतारे ऑनलाइन उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पीकपाणी नोंदविणे, पीककर्ज घेणे तसेच शासकीय अनुदानाचा लाभ मिळविणे यांसारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत होते.
या गंभीर समस्येची दखल घेत तहसीलदार, अकोले यांनी आवश्यक प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे येथे पाठविला होता. हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी शिवाजी पाटोळे, महेश सोनवणे सर व केशव बोडके हे सातत्याने पाठपुरावा करीत होते.
अखेर गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी शिवाजी पाटोळे, महेश सोनवणे सर व केशव बोडके यांनी जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे येथे प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमोर संपूर्ण प्रस्ताव सादर करून प्रकरणाची सविस्तर माहिती दिली व शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी समजावून सांगितल्या.
या पाठपुराव्यानंतर जमाबंदी आयुक्तांनी संबंधित प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिल्याने वरखडवाडी व दोडकनदी या दोन्ही महसुली गावांचा सातबारा ऑनलाइन उपलब्ध होण्यासंदर्भातील प्रश्न मार्गी लागला आहे.
या निर्णयामुळे दोन्ही गावांतील शेतकऱ्यांना सातबारा उतारे, पीकपाणी नोंदी, पीककर्ज व शासकीय अनुदानाशी संबंधित कामे सुलभ होण्याची अपेक्षा आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाच्या निराकरणामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

